Thursday 29 June 2017

नेत्यांच्या शिक्षणाचा परिणाम...

डॉ. मनमोहनसिंग!!!!!!!!!
 आधीच घोषित केले होते. उच्च-पदस्थ सरकारी निवासस्थान लवकर सोडून देणारे फार कमी नेते आपल्या देशात आहेत त्यामुळे मुदत संपण्याच्या आतच सरकारी घर सोडण्याची त्यांची वृत्ती अधिकच उठून दिसते आणि त्यांच्या सात्विक, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला ते साजेसेच आहे.

डॉ. सिंग यांच्यावर मी माध्यमांमधून अनेकदा टीका केली. पंतप्रधानपदाची त्यांची कारकीर्द चांगली राहिली नाही, भ्रष्टाचार प्रचंड वाढला, घोटाळे झाले, महागाई वाढली, मौनी प्रधानमंत्री म्हणून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले त्यासोबतच गांधी घराण्याशी त्यांची अतिरिक्त निष्ठा हाही त्यांच्यावरील टीकेचा एक मुद्दा राहिला, हे सर्व आहेच. तरीही....

डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री होते तेव्हा काही कामानिमित्त माझे मोठे बंधू आणि परभणीतील काही कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले होते त्यांनी हा अनुभव घेतला. एवढ्या मोठ्या पदावर असलेला हा मनुष्य पाहुण्यांसाठी चहाचा ट्रे चक्क स्वत:च्या हाताने आणतो ! विद्या विनयेनं शोभते याचं दुसरं उदाहरण काय असू शकतं? उच्चविद्याविभुषित माणसे आज जे बोलतात ते ऐकून देखील भीती वाटते मात्र एवढ्या उच्च पदावर असूनही डॉ. सिंग कायम विनयशील वागले. आजची राजकीय भाषणे पहिली की विनय नावाचा गुण राजकारणातून हद्दपार झाला आहे याची खात्रीच पटते. वचावचा बोलणाऱ्या लोकांपेक्षा मौन धारण केलेला नेता परवडला असे वाटण्याचे हे दिवस आहेत.

आजच्या भपकेबाज राजकारणात डॉ. सिंग उठून दिसतात ते त्यांच्या साध्या राहणीने आणि त्या साध्या राहणीचे ते अजिबात मार्केटिंग करत नाहीत; हे ही विशेष ! ते अर्थमंत्री असतांना त्यांच्या पत्नीने त्यांना गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करू नका असे सांगावे यातच सर्वकाही आले ! मला नाही वाटत की गेल्या दहा वर्षात त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुली कधीही प्रसिद्धीच्या हव्यासाने कुठे वावरल्या. नेत्यांचा समस्त गोतावळा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आवडता विषय असतांनाही त्यांचे कुटुंब प्रसिद्धीपासून दूरच राहिले, हा संस्काराचाच भाग म्हटला पाहिजे. त्यांच्या मुलींची तर नावेदेखील तुम्हाला-मला कदाचीत सांगताही येणार नाहीत.


आज त्यांच्या कारकीर्दीबद्दल काय वाटेल ते बोलले जावो, १९९१ साली देशाची बिघडलेली आर्थिक घडी मार्गावर आणणे सोपे काम नव्हते ! त्यांचे व्यावसायिक कौशल्य नरसिंहरावांनी फार कुशलपणे वापरून घेतले. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिली हे सर्वमान्य आहेच. इतर देशांच्या अर्थव्यवस्था ज्या रीतीने डबघाईला आल्या त्या मानाने भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहू शकली याचे थोडेफार का होईना, श्रेय तर त्यांना द्यायलाच हवे.

नेत्याच्या शिक्षणाचा एक परिणाम दृश्य-अदृश्यपणे लोकांना जाणवत असतो. डॉ. सिंग यांनी त्यांच्या उच्च विद्याविभूषित असण्याचे कधीही भांडवल केले नाही. नेत्याचे शिक्षण त्याच्या भाषणाच्या पहिल्या पाच ओळींमध्ये ओळखता येते आणि अडाणचोट नेता तर त्याच्या एकाच भाषणात ओळखता येतो. संसदेत आरोप होवोत की माध्यमांमध्ये, विरोधकांना तिखट, जहाल, द्वेषपूर्ण भाषेत त्यांनी उत्तर दिल्याचे उदाहरण सापडणार नाही. आता यावर 'त्यांनी उत्तरच दिल्याचे सापडणार नाही' असेही कोणी उपरोधाने म्हणेल पण अशा अहिंसक प्रतिकारासाठी फारच संयमाची गरज असते हेही नक्की. अटलजी एकदा भाषणात असे म्हणाले होते की "बोलने के लिये तो सिर्फ वाणी की जरुरत होती है, चूप रहने के लिये वाणी और विवेक दोनोकी जरुरत होती है"... ठीक आहे, काही आरोपांना त्यांच्याकडे उत्तरे नसतील म्हणून ते गप्प राहिले असतील पण एकाही आरोपाला उत्तर देता आले नसते असे नक्कीच नाही. सोशल मिडीयावर त्यांची अत्यंत अश्लाघ्य भाषेत अनेकदा निर्भत्सना झाली. माध्यमांनी त्यांच्यावर अनेक आक्रमणे केली. निश्चितच, 'विवेक' म्हणूनही ते अनेक वेळा शांत राहिले त्याचे श्रेय आपण नाकारू शकत नाही. दहा वर्षात डॉ. सिंग यांचे एकही विधान अथवा वैयक्तिक कृती वादग्रस्त ठरली नाही ही बाब फार महत्वाची आहे. नियतीने समोर आणलेली भूमिका ते शक्य तितक्या संयमाने आणि वैयक्तिक प्रामाणिकपणा राखून वठवत राहिले. अटलजींची व्याख्या एकदा कोणितरी "right man in wrong party" अशी केल्याचे स्मरते, तीच डॉ. सिंग यांचीही व्याख्या होऊ शकते असे म्हणता येईल.

शालीन, सुसंस्कृत, मृदू, संयमी, स्वत:चा उदोउदो न करणारी, उच्चविद्याविभुषित तरीही विनम्र आणि संस्कारित माणसे भारतीय राजकारणात पुढच्या काळात कदाचित दिसणार देखील नाहीत; या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांच्या सारखी माणसे फारच उठून दिसतात.

डॉ. सिंग हे उत्तम वाचक आहेत आणि त्यांचा पुस्तकांचा संग्रह फार मोठा आहे. रायसीना हिल्स वरच्या धकाधकीत त्यांना वाचायला वेळ मिळत नसणारंच, आता निवृत्तीनंतर ते नक्कीच तो आनंद घेतील. त्यांच्या सारख्या व्यक्तीला खरे तर 'सुटलो बुवा एकदाचा' असेच वाटेल.

डॉ. मनमोहनसिंग यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो. सात्विकता आणि सुसंस्कृतपणा लाभलेल्या मोजक्या भारतीय पंतप्रधानांच्या यादीत इतिहास त्यांची नक्की नोंद ठेवील. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा !

No comments:

Post a Comment