Thursday 29 June 2017

मराठी असे आमुची मायबोली...


मराठी असे आमुची मायबोली...


कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठीबद्दलचे प्रेम आणि अभिमान व्यक्त करतानाच खरंच मायमराठी भाषेचा वारसा जपला जातोय का? हे स्वतःलाच विचारण्याचीही गरज आहे.

मराठी भाषेबद्दल कळवळा व्यक्त करायचे आपले दिवस ठरलेले आहेत. एक - महाराष्ट्र दिन. दोन - मराठी भाषा दिवस. वा! क्या बात है! आपल्याला मराठी भाषा दिन साजरा करावा लागतो यातून मराठी भाषेचं वैभव दिसतं असं वाटत नाही तुम्हांला? कवी माधव ज्युलियनांनी म्हटलं होतं- नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे.माधव ज्युलियन असे म्हणाले तेव्हा मराठी ही राजभाषा नव्हती. पहा पहा माधवराव, तुमची ती दिव्य आशा पूर्ण झाली. खरं सांगू, या राजभाषेचा नखरा, तिची आभूषणं वगैरे खोटी आहेत. ती राजभाषा असेल, पण ऐश्वर्य तिला काही मिळालेलं नाही. आणि यशाची दिव्य आशा जाऊ देत, अंधुक आशासुद्धा दिसत नाही आहे.
‘‘मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती इंग्रजीचे पाय चेपी!’’ खरं खरं बोलायचं तर असं बोलावं लागेल. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती वगैरे गोष्टींबद्दल आपल्याला प्रेम वगैरे काही नाही. मराठी भाषा दिनाला आपण प्रेमाचा देखावा मात्र सुरेख करतो. तुमची-आमची मुलं कुठल्या शाळेत जातात? जगात पुढे यायचं असेल तर इंग्रजीची गरज आहे म्हणून मुलांना आपण इंग्रजी माध्यमात पाठवतोय की नाही! ते ठीक आहे. सेंट झेवियर्स, सेंट मेरीज, स्कॉटिश किंवा तत्सम शाळेत मुला-मुलींना प्रवेश मिळावा म्हणून लोक गणपतीला, कधी सत्यनारायणाला, कधी कुलदेवतेला लाच देतात. तिथे प्रवेश मिळाला की आईबाप सुटले. मला आठवतंय की, लहानपणी घरात पाहुणे आले की मला हटकून सांगितलं जायचं, ‘बाळ, मनाचे श्लोक येतात? म्हण पाहू’. आणि मी श्लोक चुकून बरोबर म्हटला की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांची छाती फुगलेली असायची. आता मराठी घरांत बाळआणि बेबीच राहिलेली नाहीत. मिलिंदचं आपण मिंकीकरतो आणि करुणा असेल तर कॅरी’! बाबा, अण्णा वगैरे शब्दही जुनाट झाले आहेत. त्यांची जागा डॅडने घेतलीय. आईची मॉम किंवा मम्मा झालीय आणि मग तीन-चार वर्षांच्या मिंकी किंवा कॅरीने पुसी कॅट पुसी कॅटपाहुण्यांसमोर, सॉरी गेस्टसमोरम्हटलं की डॅड-मॉम सुखावतात. मग कशाला आपण उगाच मराठीचा कळवळा दाखवतोय?
इंग्रजीची सत्ता मान्य करून कवी माधव ज्युलियन यांनी म्हटलं होतं, ‘मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी!मराठी माणसांनीच त्यांचा आशावाद कधीच धुळीला मिळवलाय. तिच्या लेकरांनीच तिला लाथाडलंय. तिची लेकरं तिला किती बेगुमानपणे लाथा मारतायत ते पाहायचंय? एका सुसंस्कृत मराठी घरातला संवाद सांगतो. या घरातला मुलगा वय वर्षं अठराच्या आसपास. स्वप्न एम.बी.ए. होणं वगैरे! त्याच्या वडिलांशी मी पुलंच्या साहित्याबद्दल बोलत होतो. मी मुलाला सहज बोललो, ‘पुलंचं काही वाचलंय?’‘पुलं?’ त्याने असा चेहरा केला की त्याला मी इजिप्तच्या वाणिज्य मंत्र्याबद्दल काहीतरी विचारतोय. अरे, सुप्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार’, मी थांबलो. तो म्हणाला, ‘यू मीन दॅट नोटेड मराठी रायटर पी. एल. देशपांडे? मी डॅडकडून ऐकलंय त्यांच्याबद्दल! डॅड त्यांची कॅसेट कधी कधी ऐकत असतात.त्याचा बाप माझा मित्र. मी त्याला म्हटलं, ‘अरे, त्याला पुलंचं व्यक्ती आणि वल्लीतरी वाचायला दे. तू नववी-दहावीतच पुलं कोळून प्याला होतास.बाप साहित्यप्रेमी. कविता किती झटपट करायचा. सुंदर मुलगी दिसली की लगेच. एकदा अंधेरी ते दादर प्रवासात त्याने आमच्या वर्गातल्या अरुंधती गोखलेवर कविता केली होती. तो म्हणाला, ‘काय बिघडलं त्याने पुलं नाही वाचला तर? त्याने शॉ-शेक्सपीयर वाचलाय. वुडहाऊस तो वाचतो. आपण वाचलं होतं का हे सर्व या वयात?’ तो उद्वेगाने म्हणाला, ‘मी वाचलं मराठी साहित्य. कविता केल्या. पण या दोन खोल्यांतून बाहेर पडू शकलो का? इंग्रजी अस्खलित येत नाही म्हणून आयुष्यात बरंच भोगलं. माझ्या मुलाने ते भोगू नये असं मला वाटतं. माझा मुलगा अमेरिकेला जाईल. पैसे कमवेल. सुखात लोळेल. त्याच्या काय कामाचं ते मराठी आणि मराठी साहित्य?


मध्यमवर्गातल्या बहुसंख्य घरात हेच चित्र आहे. मुलं आई-वडिलांच्या आज्ञेवरून इंग्रजीचे पाय चेपतायत. कारण त्यांच्या आईबापांना आशा आहे की, ही मॅडम खूश झाली तर आपल्या मुलामुलींची भरभराट होणार. भाबड्या मंडळींना म्हणू देत हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू तिच्या लक्तरां.मॅडमची खणानारळाने ओटी भरून जर आमच्या मुलाबाळांचं भलं होणार असेल तर तिच्या अंगावर आम्ही शाल चढवू. लटकेनात का मराठीची लक्तरं! मध्यमवर्गीय विचार हा आहे. मराठी माणसांना तुम्ही आज सांगितलंत की मुलांना इंग्रजी माध्यमात घालू नका, तर तुमचं कोणी ऐकणार नाही. इंग्रजी माध्यम म्हणजे भरभराट! इंग्रजी माध्यम म्हणजे अमेरिकेला जायचा सोपा मार्ग! फाड फाड इंग्रजी बोलता येणं म्हणजे हमखास नोकरी! वगैरे गोष्टी मराठी माणसाच्या इतक्या पक्क्या मनात बसल्या आहेत की त्यांचं मतपरिवर्तन अशक्य आहे. तुम्ही त्यांना लाख समजावून सांगा की मराठी माध्यमात शिकलेली मुलं अमेरिकेत गेली नाहीत का? त्यांनी नावलौकिक कमावला नाही का? त्यांना पैसा मिळाला नाही का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो असलं तरी त्यांना ते पटण्यासारखं नाही. ठीक आहे. जाऊ देत मुलं इंग्रजी माध्यमात शिकायला. पण त्यांना निदान घरी मराठीची गोडी लागेल एवढी तरी गोष्ट करता येईल? मातृभाषा ही कुठल्याही भाषेपेक्षा मुलांना लवकर शिकता येते. ती निदान घरी तरी शिकवा. हे लिहिताना मला लाज वाटते. पण अशी कित्येक मराठी घरं आहेत जिथे मुलांची घरी बोलण्याची भाषाही इंग्रजी आहे. मुलं इंग्रजीत बोलतात. बापही बोलतात. प्रधानाने साठेशी, साठेने संझगिरीशी, संझगिरीने राऊतशी इंग्रजीत बोलायची गरज आहे का? इंग्रजी माध्यमात शिकलेले असले तरी इंग्रजीत बोलायची गरज नाही. पण प्रधान इंग्रजीत बोलला की साठेला वाटतं की आपण इंग्रजीत बोललो नाही तर आपल्याला इंग्रजी येत नाही असा समज प्रधानाचा होईल. ते त्याला कमीपणाचं वाटतं. मग तो आपला रुबाब दाखवतो. इंग्रजीची एव्हढी धुणी धुवायची गरज आहे का?
मला तर असं वाटतंय की मुंबईतून मराठी भाषा आता हळूहळू हद्दपार होणार. मराठी माणसे एकमेकांशी मराठीत बोलणार नसतील तर इतर भाषक प्रयत्नही करणार नाहीत. मुंबईची आता स्वतःची एक वेगळीच भाषा तयार झालीय. ती इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजरातीची भेळ आहे. चर्चगेटला चलणार काअसं आपण कधी टॅक्सीवाल्याला विचारतो का? फार क्वचित. चर्चगेट चलोगे?’ वगैरेही नाही बोलत. चर्चगेट चलताय क्या?’ ही आपली भाषा असते. हिंदी, इंग्रजी शब्द आपल्या जिभेवर राज्य करीत असतात. माझं असं म्हणणं नाही की आपण अगदी सावरकरी मराठीत बोलावं. लिफ्टला उद्वाहन म्हणावं किंवा कॅज्युअल लीव्हला नैमित्तिक रजाम्हटलं पाहिजे असं नाही. पण मूळ भाषा मराठी असू देत ना. दोन-चार उदाहरणं देतो. कलकत्त्यात चार माणसं एकत्र आली की ती बंगालीत बोलतात. पण त्यांतला प्रत्येकजण मुखर्जी किंवा बॅनर्जी असतोच असं नाही. एक भीमाणी असेल, दुसरा दोशी असेल, तिसरा मूर्थी असेल, तरी ते बोलणार बंगालीत. मद्रासला हेच चित्र दिसतं. मग मुंबईतच वेगळं चित्र का? हे चित्र ज्यांनी बदलायचा विडा उचलला होता त्याच मंडळींचा कडवेपणा आज फारसा उरलेला दिसत नाही. आपल्या भाषेचा आग्रह धरण्यासाठी दुसर्यात भाषेचा किंवा भाषकांचा द्वेष करायची गरज नाही. माणसाने भाषा हव्या तेवढ्या शिकाव्यात पण घरच्या भाषेचा अपमान करू नये.
मला एक पॅरिसमधली घटना आठवतेय. पॅरिसमध्ये फिरताना मला एक पत्ता हवा होता. मी वाटेतल्या मंडळींना विचारत फिरत होतो. मी अर्थात इंग्रजीत विचारत होतो आणि माणसं खांदे उडवत नपा नपाम्हणत फ्रेंचमध्ये इंग्रजी येत नाही असं सांगत होती. त्यातल्या एकाने खांदे उडवत नपा म्हटलं खरं, पण चार पावलं पुढे गेल्यावर तो इंग्रजीत म्हणाला, ‘मला इंग्रजी येतं पण मी बोलणार नाही.फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये फक्त एका खाडीचं अंतर आहे. जर्मनीविरुद्ध युद्ध दोघे मिळून लढले. पण भाषेचा प्रश्न आला की इंग्रजी परकी होते. आपण जर कडवेपणा बाळगला नाही तर मराठी भाषा मुंबईत कधीच जगणार नाही. तुम्ही मुलांना खुशाल इंग्रजी माध्यमात पाठवा, पण घरीदारी, बाहेर तर मराठीत बोला. माझं म्हणणं आहे समोर कुणीही असो, टॅक्सीवाला, दुकानदार, अगदी पंचतारांकित रेस्टॉरण्टमधला सुटाबुटातला वेटरसुद्धा, बोलायला सुरुवात मराठीतूनच करा. त्याला अगदीच कळलं नाही तर हिंदी किंवा इंग्रजीचा आधार घ्या. मराठी बोलल्याशिवाय घरची चूल पेटणार नाही हे जेव्हा इथल्या परप्रांतीयाला कळेल तेव्हाच तो मराठी शिकणार आणि मगच मराठीचं महत्त्व वाढणार, नाहीतर मराठीला कोण किंमत देणार?आपण तेवढे तरी मराठीवर उपकार करू शकतो ना? नाहीतर मग उगाच मराठी भाषा दिन साजरा करायचा किंवा साहित्य संमेलनात मराठीच्या नावाने अश्रू ढाळायचे याला भंपकपणा म्हणतात.
'तानापिहिनिपाजा' पुस्तकातून.
‪#मराठीदिन

No comments:

Post a Comment