Wednesday 28 June 2017

कुर्यात सदा मंगलम्....


म्हणूनच लग्न पाहावं करून….
कुर्यात सदा मंगलम्.... शुभमंगल सावधान....

अंतरपाट दूर होतो आणि अक्षता डोक्यावर पडतात. तो आयुष्यभरासाठी तिचा आणि ती आयुष्यभरासाठी त्याची होते. असं दचकू नका.... सध्या लग्नाचा मोसम आहे, म्हणून लिहायची सुरुवात अशी केली. ही कोणतीही रोमॅण्टिक कथाबिथा नाहीये. मला या निमित्ताने लग्नसोहळ्यांमधले काही खास क्षण तुमच्यासमोर ठेवायचेत, जे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच अनुभवलेत. प्रत्येक लग्नाच्या धार्मिक विधींच्या पद्धती निरनिराळ्या, रिती निराळ्या. त्यामुळे एखाद्या लग्नाला आपण जर गेलो तर यापासूनच मुळी तुलनेला किंवा आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात होते, ए आमच्याकडे असं नाही करत? ए, हा विधी आता कसा ? असे प्रश्न कानी पडू लागतात. नंतर मंगलाष्टकं होऊन लग्न लागतं, मग सुरु होतो, आप्तेष्ट, मित्रपरिवाराच्या भेटीगाठींचा कार्यक्रम. एकेक करत प्रत्येक कुटुंब, ग्रुप्स स्टेजवर येतात आणि ओळख करून देऊ लागतात, त्याच वेळी काहींना आपली स्मरणशक्ती कशी आहे, हे चाचपण्याची हुक्की येते. ते मग कोडी घालू लागतात, ओळखलंस का मला ? , नाव सांग बरं माझं ? कुठे भेटलो होतो आपण सांग ? प्रश्न अनेक असतात. काही वेळा खरंच ती व्यक्ती आठवत असते, पण नाव नाही आठवत. आधी लग्नाच्या तयारीच्या धावपळीने आलेला शीण, त्यामुळे नाही म्हटलं तर येणारा मानसिक ताण, त्या दिवशीची लगबग, त्यामुळे होणारी दमछाक या साऱ्यामुळे स्टेजवरच्या त्या ओळखपरेडपर्यंत तुमचा स्टॅमिना कधीकधी नव्हे बहुतेक वेळा संपलेला असतो. त्याच वेळी हे प्रश्न येत असतात. खरोखरच, मग तुमचा कस लागतो. काही वेळा असंही असतं, आपल्याला असं विचारणारी व्यक्ती आपल्या आईची मावशी किंवा आपल्या बाबांची खूप लांब राहणारी चुलत किंवा मामे, नाहीतर आत्येबहीण असते. ती लक्षात राहणं काही
वेळा कठीण असतं. तरीही आपली फिरकी ताणली जाते.
दुसरा क्षण म्हणजे आपले फोटो काढले जातात, तेव्हाचा. लग्नाला आलेली मंडळी तुम्हाला भेटायला येऊन गेली की किंवा यायच्या आधी हे खास सेशन असतं. कपलचं फोटोशूट. वैयक्तिक आणि दोघांचे प्रोफाईल फोटो घेता घेता...तिच्या खांद्यावर त्याचं डोकं, त्याच्या खांद्यावर तिचं डोकं, कंबरेभोवती हात, मानेभोवती हात, एकमेकांच्या नजरेत नजर, डोक्याला डोकं लावणं, अशा अनेक पोझेस फोटोग्राफर सुचवत असतो. मी तर म्हणतो, अशा वेळी तुमच्या अभिनय कलेचा कस लागतो. मला तर अशा फोटोशूटच्या वेळी प्रचंड हसू येतं. काही वेळा तिला ऑकवर्ड वाटतं, तर काही वेळा त्याला. त्यातच त्याचे किंवा तिचे मित्रमैत्रिणी स्टेजखाली बसून त्याला किंवा तिला कॉन्शियस करत असतात. ग्रुप फोटोच्याही वेळी असेच एक्सप्रेशनचे मजेशीर किस्से घडत असतात.

                                                            


यानंतरचे आणखी लक्षात राहणारे क्षण म्हणजे नाव घेण्याचा अर्थात,
उखाण्याचा आणि पंगतीतला.
सुरुवातीला नाव घेण्याबद्दल. ही एक छान प्रथा आपल्याकडे आहे, नाव घ्यायचं. (एरवी एकमेकांना नावं ठेवण्यासाठी काही जण पुढे पुढे असतात, असो....) या उखाण्यांमध्येही
क्रिएटिव्हिटी दाखवता येते. शहराचं नाव घेऊन, त्या ओकेजनचं नाव त्यात घेऊन काही वेळा नाव घेतलं जातं, सरळ ‘चांदीच्या ताटात सोन्याची पळी’ किंवा मग ‘भाजीत भाजी मेथीची’ स्टाईल उखाणा.
यानिमित्ताने मी घेतलेल्या माधुरीच्या इंटरव्ह्यूची आठवण. तेव्हा तिने एक उखाणा घेतला होता, म्हणजे मी तिला तसं सांगितलं होतंच की मुलाखतीची सांगता तुझ्या
उखाण्याने करुया. आम्ही डिस्कस केलं आणि तिने घेतला उखाणा...
‘माझ्या मोहक हास्याने आणि दिलखेचक नृत्याने मी चुकवते लोकांच्या हृदयाचे ठोके,
श्रीराम नेनेंसोबत वाटचाल करताना म्हणावंसं वाटत लाईफ ओके....’
हा उखाणा फुल टू हिट ठरला अगदी माधुरीसारखाच.
असो. बॅक टू लग्नातले उखाणे.
या उखाण्यातून कधीकधी लाजरेबुजरेपणा, कधीकधी बिनधास्तपणा समोर येतो.
उखाणा घेताना कधी हळूच तिने त्याच्याकडे किंवा त्याने तिच्याकडे पाहणं,
तेव्हाच त्याच्या किंवा तिच्या मित्रांनी ह्म....असा आवाज करणं किंवा घसा
खाकरणं....(व्हिक्स की गोली लो ना यार....) इसमे एक अलगही मजा है....

उखाण्यांप्रमाणेच जेवणाच्या पंगतीचा किस्सा तर आणखी हिट असतो. लग्नातली माळ गळ्यात पडण्याआधी केळवणांची माळ लागलेली असते. आज आत्या, उद्या मामा, मग काका, मग मित्र. सुरुच असतं. आज श्रीखंड, उद्या बासुंदी, परवा गुलाबजाम, उकडीचे
मोदक. तर तिखटामध्ये कधी कोल्हापुरी भाजी, कधी रस्सा, कधी पनीरची भाजी,
तर कधी चक्क पाव-भाजी. मला तर वाटतं की, आपल्या आयुष्यात आतापर्यंत आपण
जेवढी व्हरायटी टेस्ट केलेली नसते ना तेवढी लग्न ठरलं आणि केळवणं सुरु
झाली की लग्न होईपर्यंत करून होते. तर अशा अनेक भाज्या आणि पक्वान्न
पचवल्यानंतर लग्नातही खास मेन्यू असतो. अगदी रुचकर, लोणचं पापड,
कोशिंबीर, दोन भाज्या, पुरी किंवा रोटी, नाहीतर चपाती, कटलेट, नाहीतर
कोथिंबीर वडी, एक किंवा दोन पक्वान्न. मेन्यू ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार बदलत
असतात. मात्र खाद्यपदार्थांची खैरात ठरलेलीच. मात्र वधू-वरांची पंगत बसली (एरवी बुफे किंवा बफेट डिनर असेल तरी वधू-वरांना जनरली पंगतीत बसवतात. खरंच बसून खाणंच गरजेचं असतं तेव्हा. पुन्हा एकदा थकवा इज अ रिझन.) आग्रह सुरु होतो, एक जिलेबी घे किंवा दोन गुलाबजाम घे. माझ्याकडून आणखी एक. पोटावर अत्याचार होतात खरे, पण
त्या जेवणातल्या चवीपेक्षा तो आग्रहातला गोडवा आहे ना तो काही औरच असतो. हाच गोडवा आयुष्यभर जिभेप्रमाणेच मनातही रेंगाळत असतो.
अर्थात या साऱ्याच क्षणांमध्ये गंमत असते. कोणाचा अपमान करण्याचा यामध्ये कोणाचाच हेतू नसतो. (तसाच हे लिहिताना माझाही नाही, जस्ट एन्जॉयसाठी लिहितोय.)
किंवा कोणाची खिल्ली उडवणारे हे क्षण नसतात. तुमच्या आणि हे लग्न अटेंड करणाऱ्यांच्या मनातल्या कुपीत या क्षणांचा दरवळ कायम राहणार असतो, आठवणींच्या कपाटातला या क्षणांचा अल्बम आपण पुन्हा पुन्हा उघडून पाहत असतो, ते क्षण पुन्हा पुन्हा जगत असतो.
म्हणूनच लग्न पाहावं करून.

No comments:

Post a Comment