Thursday 29 June 2017

स्तंभलेखन करण्याचे आकर्षण ...

स्तंभलेखन कसे केले जाते?
कॉलम याचा अर्थ स्तंभ. ज्या लेखात नावासह व्यक्तीगत मते किंवा अनुभव मांडले जातात व जे लेखन काही तज्ञ किंवा अधिकारी व्यक्ती आठवड्यातून नियमितपणे एखाद्या प्रकाशनासाठी करतात तेव्हा त्याला स्तंभ लेखन असे म्हटले जाते. स्तंभलेखन साहित्यिकही करू शकतात त्यामुळे काही स्तंभांना साहित्य मूल्य असू शकते. जी व्यक्ती स्तंभ लिहिते तिला स्तंभलेखक असे म्हणतात. परीक्षण म्हणजे पुस्तक परीक्षण, नाटकाचे परीक्षण हे स्तंभलेखनातच येतात. काहीवेळा स्तंभलेखन हे काही कंपन्यांकडून मागवले जाते त्याला सिंडिकेटेड कॉलम असे म्हणतात. यात त्या कंपनीने जे स्तंभलेखक ठेवले असतील त्यांचेच लेखन घेणे भाग असते. क्रिकेट विषयक स्तंभलेखन अनेकदा सिंडिकेटेड स्वरूपाचे असते. त्यात माजी क्रिकेटपटू लिहितात. दी इंडियन एक्सप्रेसमध्ये किंवा द एशियन एज या वृत्तपत्रात अशी सिंडिकेटेड पानेच वॉल स्ट्रीट जर्नल व द इकॉनॉमिस्ट वरून घेतली जातात व त्याचे पैसे मूळ वृत्तपत्राला दिले जातात, तो सिंडिकेटेड फीचर्स किंवा स्तंभलेखनाचाच प्रकार आहे.
अनेक तरूणांना स्तंभलेखन करण्याचे आकर्षण असते अलिकडचे ब्लॉग म्हणजे इंटरनेटवरील स्तंभलेखनच आहे. साध्या बातम्या कंटाळवाण्या वाटतात त्यामुळे बातमीमागची कथा किंवा आपली बातमीवरची मते मांडली जातात. बातमीची रचना साचेबंद असते तसे स्तंभलेखनात मतस्वातंत्र्य असते स्तंभलेखन ही संपादकीय मंडळाच्या मतांवर चालत नसते. ती त्या व्यक्तीची मते असतात. स्तंभलेखनाच बातमीची शिस्त नसते पण तरीही त्याचा साचा ठरलेला असतो. बातमी लिहायला शिकवता येते पण स्तंभलेखनात मुळात त्या व्यक्तीला आवड व ज्ञान असावे लागते. स्तंभलेखनात लेखनशैलीबरोबरच विचार करण्याची सवय असावी लागते, कारण अनेक स्तंभ हे मतांवर आधारित म्हणजे ओपिनिएटेड असतात. चालू घटनांवर योग्य युक्तीवादासह सडेतोड भाष्य करता येणे आवश्यक असते.
स्तंभलेखकाला आवश्यक बाबी
1.  त्याला मत मांडता आले पाहिजे.
2.  प्रश्नातील योग्य बाजू पकडून युक्तीवाद करता आले पाहिजे.
3.  त्याचे वाचन व स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे.
4.  लेखनशैली सोपी पण काहीशी भाषेच्या कसरती करणारी हवी.
5.  वेळप्रसंगी वाचकांची करमणूक झाली पाहिजे माहिती व करमणूक म्हणजे इन्फोटेनमेंटचे मिश्रण करता आले पाहिजे.
6.  तुमचे मत युक्तीवादांच्या आधारे वाचकांना पटवता आले पाहिजे
7.  टीकात्मक विश्लेषण करता आले पाहिजे.
8.  वाचनाचा व्यासंग मोठा असला पाहिजे व योग्य वेळेला योग्य ते संदर्भ देता आले पाहिजेत.
9.  स्तंभलेखन हे वैचारिक पातळीवर चालते त्यामुळे तो विचारवंतच असतो.
10. वेगवेगळी मते एकून घेण्याची, टीका स्वीकारण्याची त्याला उत्तर देण्याची तयारी हवी.
11.  कुठल्याही विषयाचे संशोधन केल्याशिवाय किंवा बरेचसे वाचल्याशिवाय स्तंभलेखन करता येत नाही.
12.  वृत्तपत्रात येणारे अनेक स्तंभ वाचून हळूहळू तुम्ही तुमची शैली बनवू शकता.
13.  स्तंभलेखकाचे स्वतंत्र वाचक तयार होतात त्यामुळे त्याचा खास वाचकवर्ग असतो.
14.  स्तंभलेखनातून वाचकाला ज्ञान व करमणूक, आंतरदृष्टी  मिळत असते.
15.  नियमित स्तंभलेखनासाठी सराव व शिस्त लागते.
16.  तुम्हाला जे पटेल तेच लिहा. तुमची मते वेगळी असतील तर कुणी सांगितले म्हणून भाडोत्री पद्धतीने लिहू नका. लवासा प्रकल्प चुकीचा आहे असे तुमचे मत असेल तर तो कसा चांगला आहे यावर स्तंभलेखन करू नका.
17.  मते स्पष्ट मांडा. हेही योग्य आणि तेही योग्य अशी नरो वा कुंजरो वा भूमिका घेऊ नका.
18.  स्तंभलेखनात अनेक विषय एकावेळी हाताळू नका. संदेश स्पष्ट असावा. त्यामुळे वाचकांवर चांगला परिणाम होतो. तुमच्या स्तंभात मध्यवर्ती भूमिका सोडून भरकटलेले लिखाण असू नये.
19.  नेहमी युक्तीवाद करताना खऱ्या माहितीचा आधार घ्या
20. तुमचे युक्तीवाद ताकदवान व तर्कसंगत असले पाहिजेत
21. तुमच्या स्तंभात आकडेवारीचाच भरणा नसावा.
22.  मुद्दे प़टवून देताना समान दुवे असलेल्या घटना सांगता आल्या पाहिजेत. जर विषय तांत्रिक असेल तर तो व्यवहारातील उदाहरणे देऊन सोपा करता आला पाहिजे. चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर किती आहे सांगताना साधे दुसरे उदाहरण द्या.
23. परखड टीका करा. तो पत्रकारितेचा स्थायीभाव आहे. पुराव्याआधारे सडेतोड टीका करणारे स्तंभलेखक लोकांना आवडतात. काहीवेळा तुम्ही वादग्रस्तता निर्माण केली तरी चालते पण त्यामुळे कुणाची बदनामी किंवा व्यक्तीगत चारित्र्य यांचा पंचनामा नको. वादही तर्कसंगत असले पाहिजेत.
24.  हस्तीदंती मनोऱ्यात बसून स्तंभलेखन बेगडी होते त्याला धार येत नाही. त्यासाठी वार्ताहरांकडून खऱ्या माहितीचा आधार घ्या. नेमके वास्तव माहिती असल्याशिवाय मत व्यक्त करू नका.
25.   स्थानिक मुद्द्यांवर जास्त भर द्या. लोकांना आपल्या आजूबाजूच्या व जिव्हाळ्याच्या विषयावर वाचायला आवडते. उदा. सार्वजनिक वाहतुकीतील दोष. त्यात व्यक्तीगत अनुभव मांडा. वास्तवापासून दूर जाऊन फिजी देशात कुठे काही घडले असेल त्यावर लिहू नका.विषय वाचकाच्या जिव्हाळ्याचा असेल तरच तो त्याच्या लक्षात राहतो.
26. वाचकांना गुळमुळीत लेखन आवडत नाही. आक्रमक लिखाण आवडते. जर विषयात तुम्हालाच रस नसेल तर वाचकालाही वाटणार नाही.
27. उपाय सुचवा- स्तंभलेखन करताना नुसता प्रश्नांचा समस्यांचा पाढा वाचून उपयोगाचे नसते तर त्यावर संभाव्य उपायही सांगावेत. तोच दूरदर्शी पत्रकार असतो. लोकांना प्रश्नांची उत्तरे हवी असतात, ती तुम्हाल देता आली नाहीत तर तुम्ही स्तंभलेखक म्हणून अपयशी ठरता. भ्रष्टाचाराच्या विषयावर स्तंभलेखन करताना त्यावर नेमका उपाय सांगता आला पाहिजे. देशात भ्रष्टाचार किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तुम्ही वेगळे काय सांगता याला महत्व आहे.

28. स्तंभलेखकांची काही उदाहरणे- स्वामिनाथन अंकलेसरिया अय्यर, शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी, शोभा डे, भीष्मराज बाम (प्रेरणादायी स्तंभ)

No comments:

Post a Comment