Tuesday 17 September 2019

पाकिस्तानने दिलेल्या अण्वस्त्रयुद्धाच्या धमकीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज


पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाची आणि अण्वस्रयुद्धाची धमकी दिली आहे. गेल्या सहा महिन्यातील ही चौथी धमकी खान यांनी दिली आहे. आजच्या घडीला पाकिस्तानची प्रतिमा ही जगामध्ये दहशतवादाला निर्यात करणारा देश केवळ एवढीच नसून हा जगातील सर्वांत धोकादायक व बेजबाबदार अण्वस्रधारी देश आहे. जागतिक व्यासपीठावर काश्मिरचा मुद्दा आणून भारताला कोंडीत पकडण्याचे नेहमीचे सर्व खेळ अपयशी ठरल्यावर आता पाकिस्तानातच आरोळ्या ठोकल्या जात आहेत. पण भारत सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशा कुठल्याही गदारोळाची दखलही घ्यायला राजी नसल्याने पाकिस्तानचा संताप दिवसेदिवस अनावर होत चालला आहे. सयुंक्त राष्ट्रसंघात जाण्याविषयी सुरू झालेल्या धमक्या आता अणुयुद्धापर्यंत जाऊन पोहोचल्या, तरी भारत पाकिस्तानकडे वळूनही बघत नाही, ही सर्वाधिक क्लेशाची बाब झाली आहे.

उत्तर कोरिया आणि इराणपेक्षाही पाकिस्तान हा बेजबाबदार देश आहे. पाकिस्तानचा हा अणुकार्यक्रम किती धोकादायक आहे, तो बेजबाबदार का आहे, त्याचा धोका केवळ भारतालाच नसून जगालाही आहे. आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांचे अहवाल याविषयी काय म्हणतात हे वेळोवेळी सयुंक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनातील सभेत नमूद करण्यात आले आहे. भारतासाठी गेल्या तीन दशकात पाकिस्तान हा लष्करी डोकेदुखी कधीच नव्हता. भारताशी शस्त्राने लढणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पाकिस्तानने नवी रणनिती तयार केली. त्यात भारताच्या लोकशाही व मानवाधिकारालाच आपले हत्यार बनवण्याचा घाट घातला होता. त्यानुसार एका बाजूला काश्मिरातील फ़ुटीरवादी तरूणांना चिथावण्या देऊन जिहादी घातपाती बनवणे व अघोषित युद्ध चालवणे, हा एक भाग होता. दुसरा भाग भारताच्या विविध मानवी हक्क वा नागरी अधिकाराचा आडोसा घेऊन काश्मिरमध्ये व दिल्लीत भारतीय कायदा प्रशासनाला पोखरून काढणारी गद्दारांची फ़ळी उभी करणे. अशी दुहेरी रणनिती होती.

पाकिस्तान हा सुरुवातीपासूनच बेजबाबदार अण्वस्रधारी देश म्हणून ओळखला जातो. जागतिक मंचावर आपण तोकडे पडलो, म्हणून पाक संतापलेला नाही. किंवा जिहादी मारले गेल्याने पाक विचलीतही झालेला नाही. दोन्ही आघाडीवरची रणनिती फ़सत चालल्याने पाक खवळलेला आहे. पहिली बाजू म्हणजे लागोपाठ जिहादींचा खात्मा करून पाक प्रशिक्षीत मुजाहिदींनांना संपवण्याची ही रणनिती इथल्या काश्मीरमधील पाकपुरस्कृत गद्दारांना आधीच समजू शकली नाही. किंवा पाकला त्याची आधीच खबरबात देता आली नाही. त्यामुळेच पाकिस्तानातील अण्वस्रांबाबत व्यक्त होणारी चिंता गेल्या दशकभरापासून वाढली आहे. मागच्या वर्षी अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या थिंक टँकनी एका अहवालातून यासंदर्भातील एक धक्कादायक बाब जगासमोर आणली होती. त्यानुसार आगामी दहा वर्षात जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असणार आहे. पाकिस्तानकडे असणारी अण्वस्रांची संख्या 120 वरून 300 वर जाईल, असे या अहवालात म्हंटले होते. ही बाब भारतासह संपूर्ण जगासाठी चिंताजनक आहे.

भारत एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश म्हणून ओळखला जातो. भारताने 1998 मध्ये अण्वस्त्रांची चाचणी केली. त्यानंतर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत भाषण करताना भारताचा आण्विक धोरण मसुदा मांडला. ते म्हणाले की, यानंतर भारत कधीही अणूचाचणी करणार नाही. तसेच भारत कधीही अण्वस्त्रांनी प्रथम हल्ला करणार नाही. भारतावर कुणी अण्वस्त्र हल्ला केला, तरच अण्वस्त्रांनी प्रतिहल्ला करण्यात येईल. आम्ही स्वरक्षणासाठी आवश्यक असणार्‍या अण्वस्त्रांचीच निर्मिती करू. तसेच कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र तंत्रज्ञान इतर देशांना देण्यात येणार नाही असेही वाजपेयी यांनी सांगितले. परिणामी, आजही भारताकडे एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश म्हणून पाहिले जाते. 1998 नंतर आजतागायत भारताने एकही अणूचाचणी केलेली नाही. शिवाय अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची धमकीही दिलेली नाही, अणूतंत्रज्ञान हस्तांतरित केलेले नाही. या सर्वांमुळेच अमेरिकेने भारताबरोबर अणूकरार केला. भारत हा एकमेव देश आहे ज्याच्याबरोबर अमेरिकेने अणूकरार केलेला आहे. कारगील युद्धाच्या वेळी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचे माहीत असूनही भारताने चुकूनही अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिली नव्हती, हे लक्षात घ्यावे लागेल.
सध्या पाकिस्तानात असलेली प्रचंड आर्थिक अस्थिरता, नागरी व लष्करी नेतृत्वातील रस्सीखेच, दहशतवाद्यांचे थैमान, धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचे प्राबल्य आणि त्यांच्याकडून आजवर भारताला अण्वस्र हल्ल्यांबाबत देण्यात येत असलेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर ही अण्वस्रे जगासाठी विनाशकारी ठरू शकतात. कारण मागल्या तीन दशकात पाकिस्तानने आपल्या सुरक्षेची यंत्रणा भक्कम करण्यापेक्षा, ते काम दोन भिन्न गटांवर कंत्राटी पद्धतीने सोपवलेले आहे. आज जगभरातील ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्या सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था सुदृढ आहेत. या सर्व देशांत लोकशाही आणि राजकीय व आर्थिक स्थैर्य आहे. तिथे प्रबळ नागरी शासन आहे. या सर्व गोष्टी पाकिस्तानमध्ये दिसत नाही. पाकिस्तानमध्ये लोकशाही असली तरी तिची अवस्था डळमळीत आहे. पाकिस्तानमध्ये कमालीची अस्थिरता असून लष्कराचे प्राबल्य आहे. अमेरिका, फ्रांसमध्ये लष्कराचे प्राबल्य दिसून येत नाही, कारण तिथे सिव्हिलियन रुल आहे. चीनमध्येसुद्धा लष्कर हे कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. पाकिस्तानमध्ये तशी परिस्थिती नाही. आजघडीला पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे आहेत. तेथून जगभरात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांची निर्यात होते. याखेरीज तेथे लष्कर, दहशतवादी संघटना आणि मुलतत्ववाद्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये इस्लामिक क्रांती होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच जगाने आता इराणपेक्षा पाकिस्तानवर निर्बंध आणणे आवश्यक बनले आहे. अण्वस्त्रांबाबत पाकिस्तानचे रेकॉर्ड अतिशय खराब आहे. त्यामुळे जगाने त्वरित काळजी घेऊन पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध टाकून त्यांची अण्वस्त्रे वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. ही अण्वस्त्रे अमेरिकेने आपल्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे बनले आहे. अन्यथा संपूर्ण जगाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

  

No comments:

Post a Comment